पाउलवाट

मोठ्‌या-मोठ्‌या राजमार्गां पेक्षा एका पाउलवाटेकडे माझं आकर्षण नेहमीच जास्तं राहिलं आहे. दोघांमधे मोठं अंतर आहे, पाउलवाट चालता चालता बनते, या उलट बनलेल्या राजमार्गांवर लोकं चालतात. राजमार्गांवर चालतांना कधीच उत्सुकता नसते पण पाउलवाटेचा अंत मात्र नेहमीच अनोळखी असतो...

Wednesday, October 20, 2004

महाराष्ट्रियन रडगाणे...

कोणचाही मराठी चैनल पाहिल्यावर फार क्वचितच एखादं आनन्दाचे दृश्य दाखवत असतांना आढळेल. एरवी, नेहमी रडगाणेच सुरु असतात...हे महाराष्ट्रियन येवढे रडके कां असतात? 'महाराष्ट्रियन' हा सम्बोधन फक्त महाराष्ट्रात रहात असलेल्या लोकां पुरता नसुन त्या सर्वांकरता आहे जे 'मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे' याचं मनःपुर्वक पालन करतात.

अवंतिका, वादळवाट, पिंपळपान अनेको अश्या मालिकांचे नावं सांगता येतील ज्यामधे कोणचाही एखादं पात्र मागच्या वेळेस नेमकं केंव्हा हसलां होतां हे आठवण करणे एखाद्या नियमाने 'शंखपुष्पी' घेण्यार्‍या इसमालाही अवगढ जाणवेल.

कोणच्याही मालिकेत हे दृश्य फारच सामान्यपणे पाहिला मिळेल की एक बाई रडत बसली आहे, तिच्या गालांवरुन अश्रुंची धारा वाहत आहे आणि एक दुसरा चरित्र तिला समजावत बसला आहे. थोड्‌या वेळा नंतर तो दुसरा चरित्र सुद्घा रडायला सुरुवात करतो. मालिकेची सुरुवात किंवा अंत बहुधा असाच असतो. हा प्रकार रामदासांच्या ह्या ओवींची आठवण करवुन देतो -

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,
अकस्मात तोही पुढे जात आहे...

ही गोष्ट अगदी माझ्या समजुतीच्या बाहेरची आहे की अश्या रडक्या मालिकांना पाहावयाची हौस घरातल्या बायकांना कां बरं असते? ते अश्या सिरियल्स बघतात आणि त्या चरित्रांना सहानुभुति, म्हणुन स्वताही ढसाढस रडतात. स्वताच्या जीवनात येवढं दुखः अगोदरंच असतांना, हा 'पार्ट टाईम जॉब' कशाला करावा, हे कोडं मला तरी काही उलगडंता येत नाहीं? हा प्रकार येवढा सामान्यपणे संपायचा नसतो तर त्यानंतरही रात्री जेवणात फक्त खिचडी बनवून 'अवंतिकाच्या नवर्‍याने तिला सोडले' याचं दुःख मनवायचे, अशी प्रथाही पाळली जाते.

बाबांनो, मला तर हे सगळं काही परवडत नाहीं. म्हणुन मी तर काही हल्के-फुल्के आणि मनोरंजक असेच सिरियल्स पाहतो. मला आवडणारे काही सिरियल्सचे नावं - घडलयं बिघडलयं, तीन-तेरा पिंपळझाड, श्रियुत गंगाधर टिपरे, माझात काय पाहिलंस? आणि कु. गंगुबाई नॉनमॅट्रिक.

Monday, July 19, 2004

वाढता वाढता वाढे : 'रिमिक्स' उद्योग

सद्या जुन्या गाण्यांना परत जिवीत करणारा हा उद्योग चांगलाच वाढलाय. काही मोठ्‌या गायक-गायिका अगर संगीत तंज्ञाना सुध्दा यावर त्यांचे मतं विचारले जातात.  टी. वी. च्या बर्‍याच टॉक-शोस मधे सुध्दा हाच विषय आढळतोय. मलाही वाटलं, मी ही आपल्या ब्लॉग मधे या विषया बद्दल काही तरी लिहावे.  काही लोकांच्या मतानुसार हे जुन्या गाण्यांना मिळणारे नवीन जीवन आहे तर काही लोकं ह्याला त्यांचं अपमान असे मानतात.


माझे मत जर कोणी विचारले तर मी कोणच्याही एका पक्षाला पूर्ण समर्थन देणार नाही. कारण माझी वृत्ति सुरुवाती पासुनच कोणच्याही विषयावर निष्पक्ष विचार करण्याची असल्यामुळे मी पुर्वाग्रही नसतो. साधारणपणे कधीही विचार करतांना लोकं एका पक्षाला धरून चालतात आणि त्यानंतर त्याचा समर्थनात तर्क गोळा करतात. पण माझी पध्दत मुळापासुनच वेगळी आहे, मी आधी सर्व माहिती गोळा करतो त्यानंतर आपला पक्ष ठरवतो.


काही तरी नवीन चाळे म्हणुन ठीक आहे पण काही रिमिक्स करणारे डी. जे. तर ह्या प्रयोगाला मुळ कलाकारांना श्रध्दांजली सुध्दा म्हणतात. पण या गाण्यांचा व्हीडीयो पाहील्यावर असले काही विचार येतात तरी का आपल्या मनात? उद्या क्लोज-अप टुथपेस्ट वाले सुध्दा म्हणतील की त्यांचे नवीन एड 'क्या आप क्लोज-अप करते है...'  महान गायक सहगल यांना श्रध्दांजली आहे. शुध्द व्यावसायिकतेच्या केंद्रीभूत, पुन्हा रचलेल्या, ह्या गाण्यांचा मुळ कलाकारांशी काहीच सम्बध्द नसतो. यावर एका नव्या संगीत तंज्ञानी हे सुचविले की कमीत कमी व्हीडीयो मधे त्या मुळ कलाकारांचे चित्र तरी दाखवण्यात यावे. पण असे केल्यावर, गाण्यांना हाच प्रतिसाद मिळेल का?  हे सांगणे कठीण आहे. कारण जास्तकरून आमचे 'रसिक' जन हे गाणे फक्त डोळ्यांना शेक मिळावे म्हणुन पहात असावे, असे मला तरी वाटते. येवढच काय, तर व्हीडीयो चालत असतांना, जर आवाज पूर्ण बंद ही केले तर त्यांची काहीच हरकत नसणार, याची मला खात्री आहे.


या नव्या उद्योगाचा एकमात्र फायदा जो मला दिसतो तो असा की आधी जे लोकं सहगल, देविकारानी, उमा देवी (टुनटुन), नुरजहाँ आणि शमशाद बेगम अशा महान आणि अमर कलाकारांचे फक्तं नावं ऐकल्यावर सुध्दा नाक मुरडायचे अगर हसायचे, तेच लोकं आज नकळत त्याच कलाकारांच्या गाण्यांवर नाचत आहे.


या वाढत्या प्रकारानी एका आणखी चिंतेला वाट दिली - आजच्या संगीत जगात खर्‍या सृजनात्मकतेची फार कमी आढळते. आज परत गरज आहे खय्याम, मदन मोहन, शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन आणि नौशाद सारख्या थोर संगीत तंज्ञांची ज्यांच्या काळजयी कृतिंचा जादु आजपण तसाच कायम आहे. येथे गीतकारांची भुमिका सुध्दा कमी लेखता कामा नये.

अशातला आणखी एक प्रयोग पुर्वी झाला होता, हे 'झंकार बीट्‌स' नावाने प्रसिध्द झाले होते. पण तेंव्हा व्हीडीयोचा येवढा प्रस्त नसल्यामुळे, त्याला 'रिमिक्स' सारखा प्रतिसाद नाही मिळाला.


एकुण विचार केला तर 'रिमिक्स' काही वाईट नाही पण कमीत कमी व्हीडीयोच्या अंती मुळ कलाकारांचे नाव तरी दाखवून त्यांना हवे तितके महत्व ज़रूर द्यावे.Thursday, July 08, 2004

अर्थ संकल्प सादर...

यावर्षीचा अर्थ संकल्प, म्हणजे, मला तरी, काही विशेष पटलेला नाहीं. सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे- 'सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण नाहीं' या उद्‌घोषणे मुळे परत किंचीत सावरलेला असा शेअर बाजार परत कोसळण्याची शक्यता आहे. लालू महाराजांनी सुद्घा अपल्या मनासारखे करवुन घेतले आणि बिहारसाठी राष्ट्रीय विकास योजनेतून ३२२५ कोटी रूपये अडकावले. मला यात मुळीच हरकत नाहीं पण कृपा करून लालूनी नंतर मात्र सर्वांना सांगावे तरी की बिहार मधे कोणचा विकास केला गेला...

Friday, July 02, 2004

माझे आजोबा

लहानपणी आजोबा रागवायचे जर आम्हीं त्यांच्या समोर हिंदीत बोलायचो. तेंव्हा आजोबा नक्की कशाला रागवत आहेत हे समजायला आम्हीं खरोखरच लहान होतो. पण आज माझ्या मनात मराठी भाषेबद्दल जी आपुलकी व आदर आहे त्याची 'बी' आजोबांनींच चिमुकल्या मनात नकळत पेरली होती. आई सांगते त्यांना पुस्तकांची विशेष आवड होती. मराठी कवितेबद्दल त्यांचं प्रेम तर मी त्यांच्या मुखातुनच ऐकले आहे. एखादी कविता ऐकवतांना इतके बेभान होउन जायचे जसे तेच त्याचे रचनाकार आहेत. आज त्याच अत्यंत प्रेमळ आजोबांची आठवण करीत या पाउलवाटेची सुरुआत करतोय...